कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापुरातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांची अग्रणी आणि शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशनचा शताब्दी सोहळा विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. पुढील वर्षी २०२४ ला कोल्हापूर मेडिकल असोसिएशनला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षाचा शुभारंभ सोहळा बुधवारी दिनांक
२९ मार्च २०२३ रोजी संपन्न होत आहे. या शताब्दी वर्ष शुभारंभ सोहळ्यास पद्मविभूषण, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आणि देशाचे पेटंट मॅन डॉ. रघुनाथ माशेलकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज असणार आहेत. तसेच इंडीयन मेडीकल असोसिएशनचे राज्य अध्यक्ष डॉ.रमेश कुटे, सचिव डॉ.संतोष कदम, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण या मान्यवरांच्या उपस्थितीत या शताब्दी वर्ष शुभारंभ सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती कोल्हापूर मेडिकलच्या अध्यक्षा डॉ. गीता पिल्लाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा शताब्दी वर्ष शुभारंभ सोहळा बुधवारी दिनांक २९ मार्च रोजी केशवराव भोसले नाट्यगृह येथे सायंकाळी ४ ते ७ या वेळेत संपन्न होणार आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर हे”आरोग्य क्षेत्रातील पुनर्शोध”(reinvention in health care) या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बाल आरोग्य केंद्र आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपचार केंद्र सध्या सुरु आहे. तसेच स्त्री आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले आहे. यामार्फत ३०० मुलींना गर्भाशय मुख कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण मोफत करण्यात आले आहे. ही लसीकरण मोहीम नियमितपणे सुरु रहाणार आहे.हे शताब्दी वर्ष लोकोत्सव म्हणून साजरे करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस सचिव डॉ. ए.बी. पाटील, शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. अजित चांदेलकर, सचिव
डॉ. उध्दव पाटील, समन्वयक डॉ. रविंद्र शिंदे,डॉ.अमोल कोडोलीकर,डॉ.राजेंद्र वायचळ,डॉ. अशोक जाधव,डॉ. आनंद कामत,डॉ. आबासाहेब शिर्के,डॉ. राधिका जोशी,डॉ. अरूण धुमाळे,डॉ. सूर्यकांत मस्कर,डॉ. शिरीष पवार, जीपीए चे नूतन अध्यक्ष डॉ. राजेश सातपुते, सचिव डॉ. हरीश नांगरे, डॉ. प्रविण नाईक आदी उपस्थित होते.