
परदेशात राहूनही महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि सामाजिक मूल्ये जपण्याचे कार्य महाराष्ट्र मंडळ, दुबई सातत्याने करत आहे.मंडळ संस्कृती, सण-उत्सव, मनोरंजन आणि लोकसेवा या चारही क्षेत्रांत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मराठी समाजाला एकत्र आणण्यासाठी कटिबद्ध आहे.याच ध्येयाने प्रेरित होऊन दिनांक २७ जून २०२६ रोजी डॅन्यूब स्पोर्ट्स वर्ल्ड, दुबई येथील अत्याधुनिक क्रीडा संकुलात “क्रीडा दिन २०२६” हा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे आयोजन २०२६-२७ कार्यकारिणी सदस्यांच्या अमूल्य सहकार्याने नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले.कार्यक्रमाचे उद्घाटन यूएई योग समितीचे अध्यक्ष तसेच यूएई स्पोर्ट्स फेडरेशनच्या संचालक मंडळाचे सदस्य मा. अहमद इब्राहिम मुसाबीह यांच्या हस्ते झाले. प्रायोजकांचे प्रतिनिधी, पाहुणे, मंडळाच्या संस्थापक समितीचे सदस्य, खेळाडू आणि प्रेक्षक या वेळी आवर्जून उपस्थित होते.खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असून “आरोग्यम् धनसंपदा” या उक्तीचे महत्त्व या निमित्ताने अधोरेखित झाले. खेळांमुळे शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुणांचा विकास होतो तसेच दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडतो, हेही स्पष्ट करण्यात आले.या क्रीडा दिनात टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि क्रिकेट यांसारखे संघभावना वाढवणारे खेळ तसेच बुद्धिबळ आणि कॅरम यांसारखे बुद्धीला चालना देणारे बैठ्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटांतील सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.खेळांसोबत “योग अभ्यास” उपक्रमामध्ये सूर्यनमस्कार व विविध आसनांची सदस्यांकडून योग शिक्षकांनी चाचणी घेतली. यामधून दैनंदिन जीवनात सशक्त शरीर आणि मानसिक एकाग्रता कशी साधता येते, याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. तसेच सर्वांसाठी आयोजित विविध “फन गेम्स” उपक्रमांनाही मोठा प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमादरम्यान ‘वी केयर’ मेडिकल सेंटरच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा उपस्थित सभासदांनी पूर्णपणे लाभ घेतला

दिवसभर चाललेल्या या क्रीडा महोत्सवात विविध स्पर्धकांनी पारितोषिके पटकावली. सदस्यांना आपापसांतील मैत्री, संवाद आणि खेळांवरील चर्चेमुळे हा दिवस सर्वांसाठी संस्मरणीय ठरला. विशेष आकर्षण म्हणजे पारितोषिक वितरणासाठी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि निवेदिका धनश्री दामले उपस्थित होत्या, ज्यामुळे कार्यक्रमाला आगळीच शोभा आली. सदस्यांनी या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाचे कौतुक केले.या भव्य उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये लिंक मिडल ईस्ट, अदिल ट्रेडिंग, डॅन्यूब प्रॉपर्टीज, विबग्योर रिअल इस्टेट, बियाणी ज्वेलर्स आणि वी केयर मेडिकल सेंटर या प्रायोजकांचे मोलाचे योगदान लाभले.यूएईमध्ये या कार्यक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत असून, मंडळाच्या पुढील उपक्रमांची उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे

